महात्मा गांधी विद्यामंदिर
महात्मा गांधी विद्यामंदिर
उदात्त स्वप्नपुर्तीची सात दशके
- प्रा. विद्या सुर्वे बोरसे, नाशिक
‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा पूर्वजांनी दिलेला केवळ एक मुलमंत्र नाही. देशातील महान नेतृत्वाने युगानुयुगे जपलेले समाजाच्या उद्धाराचे ते एक मंगलमयी स्वप्न आहे. हजारो वर्षांपासून हे स्वप्न सतत पाहिले गेले आहे, इतिहासातील थोर व्यक्तिमत्वांनी हे स्वप्न साकार करण्याचा त्यात्या काळात प्रयत्न केला आहे. एकोणिसाव्या शतकात या मुलमंत्राला महात्मा जोतीबा फुले यांनी नवा आयाम दिला. या स्वप्नाकडे जाण्यासाठी शिक्षणाचा नवा विचार जोडला. विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी ही ज्ञानज्योत तेवती रहावी यासाठी समाजाचे दिग्दर्शन केले. या उजेड यात्रिकांच्या वाटांवर चालणारे आणि बहुजनांच्या उन्नतीसाठी ज्ञानाच्या महासागराला वाडीवस्तीत, डोंगरद-यात घेऊन जाणारे एक होते कर्मवीर भाऊसाहेब हिरे.
स्वातंत्र्यसेनानी, बहुजन समाजाचे नेते, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते, आदिवासी, कष्टकरी, श्रमिकांसाठी संस्थात्मक निर्मिती करणारे भाग्यविधाते, उत्तर महाराष्ट्रात सहकाराची गंगा घेऊन येणारे भगीरथ, कुळकायद्याचे जनक, शिक्षण व सहकारमहर्षी म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाराष्ट्राला परिचित आहेत. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी भारतीय swaatNtryaachyuaस्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते. उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी जनतेने त्यांना स्वातंत्र्यपूर्वकाळापासून दिली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी या भागाचे प्रश्न व अडचणी दूर करण्यासाठी नेहमीच अग्रक्रम दिला. ठक्कर बाप्पा यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘आदिवासी सेवा समिती’ची मुहूर्तमेढ रोवली. नेतृत्वाला प्रदेशाच्या सीमा नसतात हे खरेच, त्यामुळे मराठवाडा विदर्भापासून, दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सहकार, कृषि, शिक्षण आणि वित्त सहाय्य करणा-या विविध संस्थांच्या निर्मितीमध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे भरीव योगदान राहिले. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण यासर्वांशी त्यांचा आपुलकीचा स्नेह होता. असे असले तरी नाशिक जिल्हा व परिसरावर कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा विशेष लोभ होता. महात्मा गांधी यांच्यावर असणारी नितांत श्रद्धा त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा कणा होती. गांधी विचार हाच कर्मवीरांचा आचार होता आणि त्यातूनच २ ऑक्टोबर १९५२ रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर या शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे या संस्थेचे ब्रीद आहे. गेली सात दशके संस्थेची वाटचाल याच ध्येयाने प्रेरित होऊन झाली आहे.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी सुशिक्षित, स्वावलंबी, उद्योगी, सक्षम आणि राष्ट्राच्या उन्नतीत योगदान देणा-या तरुणाचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाचे बांधकाम गेली सात दशके ‘महात्मा गांधी विद्यामंदिर’ या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. स्वातंत्र्यानंतरची सात दशके खरेतर या उदात्त स्वप्नपुर्तीची सात दशके आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी बीज पेरले होते, लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी हे रोपटे जोपासले, मोठे केले. लोकमाता महिलारत्न पुष्पाताई हिरे यांनी हा वेलू गगनावरी नेला, काळाची मागणी आणि पर्यावरणाची गरज लक्षात घेऊन माजी मंत्री समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे यांनी संस्थेला नवा चेहरा दिला आणि माजी शिक्षक आमदार डॉ अपूर्व हिरे आणि. डॉ. अद्वय हिरे यांनी एकविसाव्या शतकाला अनुरूप बदल करत ‘महात्मा गांधी विद्यामंदिर’ या संस्थेला वटवृक्षाच्या रुपात उभे केले आहे. दूरदर्शी नेतृत्वाच्या चार पिढ्यांच्या विचारातून, ज्ञानलालसेतून, विज्ञानवादी दृष्टीकोणातून, कलाप्रेमातून आणि सामाजिक बांधिलकीतून ‘महात्मा गांधी vidyaविद्यामंदिर’ ही संस्था आज उभी आहे. मा. सौ. स्मिताताई हिरे यांनी आपुलकीने आणि मायेच्या ममतेने या वटवृक्षाचे वेळोवेळी सिंचन केले आहे.
नाशिक परिसर हा आज देशात एज्युकेशन हब म्हणून ओळखला जात आहे. देशाच्या कानाकोप-यातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत आहेत. देशातील दोन महत्वाची विद्यापीठे या शहरात आहेत. ‘महात्मा गांधी विद्यामंदिर’ या संस्थेची वर्तमान बांधणी हीसुद्धा एका स्वतंत्र विद्यापिठासारखीच आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपारिक ज्ञानशाखांसोबत वैद्यक, कृषि, व्यवस्थापन, विधी, हॉटेल प्रबंधन, संगणकशास्त्र, कौशल्य विकास, शिक्षणशास्त्र, औषधनिर्माण, संगीत, चित्रकला, तंत्रशिक्षण, प्रयोगजीवी कला, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातील उच्च शिक्षण महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या विविध महाविद्यालयातून मिळते. नाशिक जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात या संस्थेने आपले शैक्षणिक जाळे विणलेले आहे. याशिवाय राजस्थान मधील उदयपुर येथेही संस्थेचे दंत वैद्यकीय महाविद्यालय आहे. ‘केजी टू पीजी’ अशी सर्व पातळ्यांवर ‘क्वालिटी एज्युकेशन’ देणारी संस्था म्हणून ‘महात्मा गांधी विद्यामंदिर’ या संस्थेचा लौकिक आहे. आज संस्थेचे कार्य ९६ शाखा-उपशाखांमधून अवाहत सुरु आहे. सत्तर हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि तीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत. नाशिक शहरातील पंचवटी येथे असाणारे संस्थेचे मुख्य कार्यालय त्याच्या पारदर्शी प्रशासनासाठी सुपरिचित आहे. मालेगाव कँप परिसरात संस्थेचा दुसरा मोठा शैक्षणिक कँम्पस आहे. महाराजा सायाजीराव गायकवाड यांच्या नावाने १९५५ साली स्थापन करण्यात आलेले महाविद्यालय, श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, कम्युनिटी रेडीओ सेंटर ही या कँपसच्या वैभवात भर घालणारी ज्ञानकेंद्रे आहेत. पारंपारिक विषयांसोबतच मुलभूत संशोधनाला वाव असणारे विषय आणि सातत्याने दुर्लक्षिले गेलेले उपयोजित विषय याकडे संस्थेने विशेष लक्ष पुरवले आहे. ‘क्लिनिकल सायाकोलोजी’ सारख्या विषयात संशोधन करण्याची सोय महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी उपलब्ध आहे, यात संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा समावेश आहे. सुरगाणा, हरसूल या आदिवासी भागात संस्थेने दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा स्वीकारला आहे. संस्थेचे मनमाड आणि येवला येथील महाविद्यालय हे उत्तम महाविद्यालयांपैकी आहेत. नामपूर, निमगाव, नांदगाव या ठिकाणाची महाविद्यालये त्यांच्या अभिनव उपक्रमशीलतेमुळे सतत चर्चेत असतात. विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी सज्ज अशा इमारती, त्या त्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक, अध्यापकवर्ग, विस्तीर्ण क्रीडांगणे, संशोधनाची व अध्यापनाची अद्ययावत उपकरणे, नव्या जुन्या संदर्भांनी युक्त ग्रंथालये अशा अनेक बाबी ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ संस्थेची बलस्थाने आहेत. महाराष्ट्रभूषण थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त समीक्षक म. सु. पाटील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मालेगाव आणि मनमाड येथील महाविद्यालयात प्राचार्य होते, यावरूनही या संस्थेच्या गुणवत्तेचा आग्रह लक्षात घेता येईल.
शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत मग ती स्पर्धा क्रीडा क्षेत्रातील असो की सायन्स ओलंपियाड असो संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नाममुद्रा त्यावर उमटवलेली आहे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा, कर्मवीर भाऊसाहेब हिरे वक्तृत्व स्पर्धा, संगीत महोत्सव, लोकोपयोगी व्याख्यानमाला, रोजगार मेळावे व मार्गदर्शन, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री सन्मानाचे विविध कार्यक्रम अशा प्रकारच्या विविध उपक्रमाची रेलचेल संस्थेत वर्षभर सुरु असते. कोविड काळात जेव्हा शिक्षणक्षेत्रात ब-यापैकी शांतता दिसत आहे संस्थेने जागोजागी असणा-या आपल्या इमारती कोरोना सेंटर म्हणून किंवा आयसोलेशन सेंटर म्हणून सर्वसामान्य जनतेला खुल्या करून दिल्या आणि आणि समाजाप्रती असणारी नाळ अधिकच घट्ट केली. महात्मा गांधी विद्यामंदिरचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे यांच्या सकारात्मक, अष्टपैलू आणि कार्यकुशल नेतृत्वाखाली संस्थेची दिशादर्शक व गतिमान वाटचाल सुरु आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा केवळ एक मुलमंत्र नाही तर समाजातील थोर राष्ट्रपुरुषांनी पाहिलेले दिव्य स्वप्न आहे. हे स्वप्न कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी नाशिकच्या तपोभूमीत पेरले डॉ अपूर्व हिरे यांनी त्याचे वटवृक्षात रुपांतर केले आहे. या स्वप्नपूर्तीच्या सात दशकांच्या वाटचालीनिमित्त आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा!
(प्रा. विद्या सुर्वे बोरसे या नाशिक येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असून महात्मा गांधी विद्या मंदिर च्या जनसंपर्क विभागाच्या मुख्याधिकारी आहेत. संपर्क – ९४०५५४७००२)

Comments
Post a Comment