कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुण्यतिथी विशेष लेख.
- Get link
- X
- Other Apps
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारः कर्मवीर भाऊसाहेब हिरे
प्रा. विद्या सुर्वे बोरसे
मुख्याधिकारी
जनसंपर्क विभाग
महात्मा गांधीविद्यामंदिर
संपर्क – ९४०५५४७००२
दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने भाऊसाहेब हिरे यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध.
एखादे राज्य, एखादे राष्ट्र कोणत्या मुद्द्यांवर उभे रहाते? शिक्षण, सहकार, उद्योग, कृषीविकास, दळणवळणाच्या मुलभुत सोई अश्या मुद्द्यांचा यासंदर्भाने निर्देश करता येईल. या सगळ्यांसमवेत आणखी एका गुणाची गरज असते आणि हा गुण उपजत असावा लागतो. स्वतःच्या भुमिविषयीची, भूप्रदेशाविषयीची आस्था आणि मायभूच्या संस्कृतीवरील अदम्य विश्वास, यातूनच पुढे राष्ट्रवादाच्या, देशप्रेमाच्या संकल्पणेचा उदय होत असतो.
विसाव्या शतकातील भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास काळजीपूर्वक अभ्यासला तर असे लक्षात येईल की राज्य आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी अनेक थोरामोठ्यांनी आपल्या जीवनाचा होम केला आणि त्यातूनच आजच्या आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण झाली आहे.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे त्या महान व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांनी भारताची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि सामान्य काष्टकरी जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न यांच्यासाठीच आपले आयुष्य वेचले. ‘कर्मवीर’ आणि ‘सहकार महर्षी’ या पदव्या देऊन म्हणुनच सामान्य माणसाने त्यांचा सन्मान केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी गोर गरीब, आदिवासी, श्रमिकांच्या आयुष्याला प्रकाशमान करुन टाकले. परिसरातील प्रत्येक व्यक्ती साक्षर असावा ही त्यांची ईच्छा होती आणि म्हणुनच प्राथमिक शिक्षणापासून त्यांनी आपल्या शिक्षणविषयक कार्याला प्रारंभ केला. १९३७ साली हिरे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ निमगांव या संस्थेची स्थापना केली. ठक्करबप्पा यांच्या सूचनेनंतर १९४१-४२ पासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारल्या, वसतिगृहांची निर्मिती केली, यातूनच १९४५ साली आदिवासी सेवा समिती अस्तित्वात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने आपले लक्ष प्राथमिक शिक्षणाकडे वळवले. हे लक्षात घेऊन कर्मवीरांनी आपला मोर्चा माध्यमिक शिक्षणाकडे वळवला. ‘सरकार जे करत नाही, ते आपण करावे’ अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांची पायाभरणी त्यांनी केली. १९५० साली मालेगाव येथे न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना करण्यात आली. पुढच्या दोन वर्षातच त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर ही राज्यातील शिक्षणविश्वात सन्मानाचे स्थान असणारी संस्था उभारली. शेतकी शाळा, प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज, रिमांड होम अशा विविध सर्जनशिल कार्याची निर्मिती करत असतानाच १९५९ साली कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. नाशिक आणि परीसरामध्ये आज या सगळ्याच शिक्षण संस्था व संस्थांची शाळा महाविद्यालये सुसज्ज आणि अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त अशा स्वरुपात उभी आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे असे दिसेल.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना लौकीक अर्थाने केवळ पंचावन्न वर्षांचे आयुष्य लाभले. १ मार्च १९०५ साली त्यांचा जन्म झाला आणि ६ नोव्हेंबर १९६१ रोजी त्यांचा देह अनंतात विलीन झाला. पण भाऊसाहेबांच्या आयुष्याची ही पंचवन्न छपन्न वर्षे उत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीची सोनेरी पाने आहेत. शिक्षण, सहकार, आर्थिक संस्था, कृषी आणि राजकारण या क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी आपल्या कार्याचे मानदंड प्रस्थापित केले. हा प्रदेश औद्योगिक दृष्टीने कसा संपन्न करता येईल यासाठी त्यांचे अखेरच्या काळात प्रयत्न सुरु होते. त्यांना अधिक आयुष्य लाभले असते तर महाराष्ट्राचा इतिहास निराळा राहिला असता. याचे एक कारण असे की भाऊसाहेब हे अतिशय करड्या शिस्तीचे आणि तरीही फणसाचा गोडवा असणारे व्यक्तीमत्व होते. राजकारणातील विरोधकांनीही मान्य करावी अशी मांडणी ते करत. आदिवासी कष्टकरी जनतेप्रति त्यांचा कळवळा आणि समाजाच्या विकासाची चिंता हेच त्यांच्या चिंतनाचा विषय होते. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी पुढाकार घेतला नसता आणि आग्रही भुमिका मांडली नसती तर कुळकायद्याची अंमलबजावणी झालीच नसती. त्यांच्या भुमिकेमुळेच महाराष्ट्रातील राबत्या हातांना सन्मानाचे जिणे वाट्याला आले. संयुक्त महाराष्ट्राचे बिजारोपण ज्या आठ दहा लोकांनी केले, कर्मविर भाऊसाहेब हिरे हे त्यांच्यापैकी एक होते. १९४७ पासून त्यांनी सतत्याने संयुक्त महाराष्ट्राचा पाठपुरावा केला. १९५३ साली नागपुर यथे संयुक्त महाराष्ट्रासाठी जी ऐतिहासिक बैठक झाली, त्या बैठकीच्या आयोजनासाठी त्यांनी केवळ पुढाकारच घेतला नाही तर ही बैठक यशस्वी व्हावी आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले. या बैठकीला ‘महाराष्ट्रा’चे प्रतिनिधी म्हणुन भाऊसाहेब हिरे अग्रस्थानी होते.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे व्यक्तीमत्व हे सत्यशोधकी विचार परंपरेतून निर्माण झालेले होते. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी वेळोवेळी तुरुंगवास भोगलेला होता. तत्वांशी मूरड घालून केले जाणारे राजकारण त्यांना मानवणारे नव्हते, मूल्यांशी फारकत करण्यापेक्षा मंत्रीपदाची खुर्ची सोडणे त्यांना महत्वाचे वाटले आणि म्हणुन संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा निर्णायक भुमिका घेण्याची वेळ आली कर्मविर भाऊसाहेब हिरे सत्तेपासून दूर जाऊन जनतेच्या बाजुने उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आपला लढा लढत राहिले. राजकारणी व्यक्ती ही समाजाची विश्वस्त असते यावरती त्यांची श्रद्धा होती, ते त्यांनी आपल्या कार्यातून सप्रमाण दाखवून दिले.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी पारतंत्र्यातील अंधार पाहिला होता. हा अंधार दूर व्हायचा असेल आणि खर्या अर्थाने स्वतंत्र व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे ते मानत. त्यांच्या प्रयत्नातूनच महाराष्ट्रात नंदनवन उभे राहिले. त्यामुळेच कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणावे लागते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment